‘छावा’ सिनेमा सध्या मोठ्या चर्चेत आहे आणि नुकताच या सिनेमाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ट्रेलरने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे, परंतु बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांच्या सोबतीला अनेक मराठी कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. त्यापैकी पहिलं नाव आहे ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम सुव्रत जोशी. सुव्रत विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
सुव्रतने ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये देखील अत्यंत प्रशंसनीय भूमिका साकारली होती, जी प्रचंड लोकप्रिय झाली. आता तो पुन्हा एकदा एक दमदार भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. याबद्दल बोलताना सुव्रत म्हणतो, “छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची महती जगभर पोहोचवायला हवी आणि दुर्दैवाने त्यांचा इतिहास लोकांपर्यंत फारसा पोहोचलेला नाही. त्यांचा कार्याचा महत्त्व प्रेक्षकांना समजावण्यासाठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांनी या चित्रपटाचा विचार केला आणि मी त्याचा एक भाग होण्याचा संयोग साधला, हे मला अत्यंत आनंद देणारी गोष्ट आहे. महाराजांच्या काळावर आधारित ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची इच्छा मला होती आणि ती आज या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे.”
सुव्रतसोबत या चित्रपटात आणखी काही मराठी कलाकारही आहेत. सुव्रतची भूमिका अद्याप घोषित झालेली नसली तरी त्याच्यासोबत मराठी अभिनेता संतोष जुवेकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये संतोषच्या लुकची झलक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर आशिष पाथोडे आणि अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटे यांनाही ‘छावा’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणं अधिकच रोमांचक ठरणार आहे.