Rain Update Today – छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण जवळपास पूर्णपणे भरले आहे. धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते.
जायकवाडी धरणात 87 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासून कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. पावसाच्या प्रचंड जोरामुळे पाचोड खुर्द आणि पाचोड या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांमध्ये नदी दुथडी भरून वाहत आहे.
हे देखील वाचा: जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ; नाशिक-नगरमधून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही
बीड: बीडमधील दगडी पुलावरून पाणी वाहत असल्याने पेठ बीड आणि जुना बीडकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. बिंदुसरा नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. दगडी पुलावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. प्रशासनाने बिंदुसरा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हे देखील वाचा: आता रोजगारच रोजगार: छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक शहर वसणार, देशभर 12 ठिकाणी विकासाचा हुंकार
जालना: जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात रविवारी दुपारनंतर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. शहर आणि तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्ते पाण्याने भरले असून शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे. तालुक्यातील सर्वच गाव पावसानं झोडपून काढले आहे. मंठा शहरात देखील रस्ते जलमय झाले आहेत. पांगरी, पाटोदा, सांगवी आणि इतर 5-6 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पांगरी गावचा संपर्क तुटल्यामुळे 200 ते 250 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. पांगरी आणि परिसरातील पाझर तलाव पूर्ण क्षमेतेने भरल्याने, तो फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील कुटुंबांना उंचावरील मंदिर आणि इतर सुरक्षित ठिकाणांवर हलवण्यात आले आहे.