Board Exams Timetable 2024: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यक्रम तयार केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांवर असलेला परीक्षा ताण कमी होईल आणि अभ्यासातील घोकंपट्टीला थांबवले जाईल.
या नवीन आराखड्यात परीक्षेतील प्रश्नांची पद्धत बदलली असून, ती क्षमताधिष्ठित प्रश्नांवर आधारित असेल. सुरवातीला नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या आराखड्याचा वापर होईल.
विद्यार्थ्यांना बदलत्या जगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानवी मूल्ये, जीवन कौशल्ये आणि नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण देण्यात येईल. तिसरी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा दोन सत्रांत होतील. नवीन आराखड्यात आरोग्य, कला आणि व्यावसायिक शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीद्वारे ज्ञान निर्मिती आणि वृद्धीला प्रोत्साहन दिले जाईल. तिसरीपासून व्यावसायिक शिक्षणाची सुरवात होईल, तिसरी ते आठवीसाठी व्यावसायिक कौशल्ये आणि नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाचा समावेश असणार आहे.
व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स आणि कृषी यांसारख्या नावीन्यपूर्ण विषयांचा समावेश असणार आहे. या आराखड्यानुसार दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न २०२५-२६ नंतर बदलला जाईल.
आगामी बोर्ड परीक्षा १० दिवस अगोदर
‘जेईई’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळ मिळावा आणि बारावीतील कमी गुण प्राप्त करणाऱ्यांना श्रेणी सुधारण्याची संधी मिळावी यासाठी आगामी बोर्ड परीक्षा १० दिवस आधी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. २३ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या. १० हजारांपर्यंत हरकती प्राप्त झाल्या असून, बोर्डाकडून पुढील १० दिवसांत वेळापत्रक अंतिम करण्यात येईल. वर्तमानात बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजित आहे.
हरकतींचा निपटारा झाल्यावर अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल.