India become a semiconductor hub: भारत सेमीकंडक्टर हब बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. भविष्यात सेमीकंडक्टरच्या वाढत्या मागणीचा विचार करता, जागतिक व देशांतर्गत कंपन्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडून देशात आतापर्यंत ६ सेमीकंडक्टर प्लांट्सला मान्यता देण्यात आली आहे. या ६ सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांमध्ये विविध कंपन्यांकडून सुमारे ₹ २.३६ लाख कोटींची गुंतवणूक केली जात आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) अंतर्गत, केंद्र सरकार सेमीकंडक्टर प्लांट्स उभारण्यासाठी कंपन्यांना ५० टक्के भांडवली सहाय्य देत आहे. भारत सेमीकंडक्टर हब झाल्यास लाखो तरुणांना रोजगार मिळेल.
अदानी ग्रुप आणि टॉवर सेमीकंडक्टर प्लांट
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे अदानी समूह आणि इस्रायलची कंपनी टॉवर सेमीकंडक्टर यांच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाला नुकतीच महाराष्ट्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे. या प्रकल्पात दोन टप्प्यांत एकूण ₹ ८३,९४७ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यानंतर उत्पादन क्षमता दरमहा ४०,००० चिप्सची असेल. दुसऱ्या टप्प्यानंतर या क्षमतेत वाढ होऊन दरमहा ८०,००० चिप्स होईल.
मायक्रोन ओएसएटी प्लांट
अमेरिकन चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मायक्रॉन गुजरातच्या साणंद जिल्ह्यात सुमारे ₹ २३,००० कोटींच्या गुंतवणुकीसह आउटसोर्सिंग असेंब्ली आणि टेस्टिंग युनिट प्लांट उभारत आहे. भारतात स्थापन झालेला हा पहिला सेमीकंडक्टर प्लांट आहे. या प्लांटमध्ये DRAM आणि NAND उत्पादनांची असेंब्ली आणि चाचणी केली जाईल. बनवलेल्या चिप्स देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत पुरवल्या जातील. हे प्लांट पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सुरू होऊ शकते. यासाठी केंद्र सरकार ५० टक्के आणि गुजरात सरकार २० टक्के आर्थिक मदत करत आहे.
टाटा-पीएसएमसी सेमीकंडक्टर प्लांट
टाटा समूह आणि तैवानी कंपनी पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC) यांच्या सहकार्याने धोलेरा, गुजरात येथे सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा (फॅब) उभारली जात आहे. मार्च २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्लांटमध्ये ₹ ९१,००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. भांडवली खर्चाच्या ५० टक्के केंद्र सरकार देणार आहे. या प्लांटची उत्पादन क्षमता दरमहा ५०,००० चिप्सची असेल. धोरेला प्लांटमधून सेमीकंडक्टर उत्पादन डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होऊ शकते.
टाटा इलेक्ट्रॉनिक्स सेमीकंडक्टर प्लांट
आसाममधील मोरीगाव येथील जागीरोड येथे टाटा इलेक्ट्रॉनिक्सद्वारे ग्रीनफिल्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा उभारली जात आहे. ईशान्येमध्ये उभारण्यात आलेला हा पहिला सेमीकंडक्टर प्लांट आहे. या प्लांटमध्ये सुमारे ₹ २७,००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
CG पॉवर साणंद OSAT प्लांट
जपानच्या रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आणि थायलंडच्या स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिक यांच्या सहकार्याने भारतीय कंपनी सीजी पॉवरद्वारे गुजरातमधील साणंद येथे एक अत्याधुनिक OSAT प्लांट तयार केला जात आहे. या प्लांटमध्ये पुढील पाच वर्षांत सुमारे ₹ ७,६०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्लांटमध्ये 5G तंत्रज्ञानामध्ये वापरण्यात येणारी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपकरणे आणि सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाईल. या प्लांटमध्ये दररोज सुमारे १.५ कोटी चिप्स बनवल्या जाणार आहेत.
केनेस सेमिकॉन प्लांट
Keynes Semicon ₹ ३,३०७ कोटींच्या गुंतवणुकीसह साणंद, गुजरात येथे OSAT प्लांट उभारत आहे. या प्लांटमध्ये दररोज सुमारे ६३ लाख चिप्स बनवल्या जातील. सप्टेंबरच्या सुरुवातीला या प्लांटला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.