Chhatrapati Sambhajinagar Airport: छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच प्रारंभ होणार आहे. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी सोमवारी शासन निर्णयाद्वारे ६८.२५ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. यामध्ये चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक १३९ एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी ३२.३० कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अडकलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी शासनाने ४५५ कोटींची तरतूद केली आहे. त्यामध्ये सोमवारी (दि. २६) अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे ६८.२५ कोटी रुपये वितरित करण्यात आले. यामध्ये चिकलठाणा विमानतळासाठी ३२.३० कोटी, गोंदिया विमानतळासाठी ५.९५ कोटी, कराड विमानतळासाठी २० कोटी आणि विविध विमानतळांच्या सुविधा-संवर्धनासाठी १० कोटी रुपये यांचा समावेश आहे.
विस्तारीकरणाची आवश्यकताः
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रतीक्षा होती. प्रारंभात १८२ एकर जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया चालू होती, पण नंतर १४७ एकर जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ८ एकर जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली आहे, त्यामुळे १३९ एकर क्षेत्र संपादित करणे आवश्यक आहे. आता निधी मिळाल्यामुळे विस्तारीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
विस्तारीकरणामध्ये काय-काय होणार?
1. चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या ९,३०० फूट म्हणजेच २,८३५ मीटर लांबीची आहे. विस्तारीकरणानंतर ती १२,००० फूट म्हणजेच ३,६६० मीटर होणार आहे.
2. धावपट्टीच्या विस्तारामुळे भविष्यात विमानतळावर कार्गो विमाने आणि जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांची उड्डाणे शक्य होणार आहेत.
3. विमानांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी समांतर ‘टॅक्सी वे’ आवश्यक आहे, जो धावपट्टीच्या विस्तारासोबतच होणार आहे.
4. विमानांची पार्किंग व्यवस्था आणि नवीन इमारतींचा समावेश यामध्ये होईल.